कोंबडीच्या पिल्लांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:39+5:302021-04-11T04:20:39+5:30
घारगाव : कोंबडीच्या पिल्लांची वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू ...
घारगाव : कोंबडीच्या पिल्लांची वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून अपघातग्रस्त वाहनांखाली दबून शेकडो कोंबड्याची पिल्ले दगावली. नाशिक-पुणे महामार्गावर शनिवारी संगमनेर तालुक्यातील पठार भागात हा अपघात घडला.
पहिला अपघात खंदरमाळ शिवारात घडला. शशिकांत शिवाजी वाल्हेकर (वय २८, रा. डोणजे, पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याहून संगमनेरच्या दिशेने कोंबडीच्या पिल्लांची वाहतूक होत असलेले पिकअप (एमएच १२ -एसएफ ८१३३) हे चारचाकी वाहन शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास पठार भागात १९ मैल (खंदरमाळ) परिसरात महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून जाऊन आदळले. या अपघातात पिकअपमधील वाल्हेकर यांचा मृत्यू झाला. चालक सुदैवाने बचावला.
दुसरा अपघात शनिवारी पहाटे गुंजाळवाडी शिवारात घडला. पुण्याहून संगमनेरच्या दिशेने पिकअप (एमएच १२ क्यूडब्लू. ९७४०) मधून कोंबडीच्या पिल्लांची वाहतूक होत असलेल्या
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला जाऊन हे वाहन धडकले. या अपघातात पिकअप उलटून पिकअपमधून प्रवास करणारा एक जण जखमी झाला. या दोन्ही अपघातात वाहनांखाली दबून कोंबड्यांची शेकडो पिल्ले दगावली.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनेष शिंदे, अरविंद गिरी, योगीराज सोनवणे या कर्मचाऱ्यांसमवेत अपघातस्थळी पोहोचले होते.