रोस्टर तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू
By चंद्रकांत शेळके | Published: May 14, 2023 08:42 AM2023-05-14T08:42:46+5:302023-05-14T08:43:09+5:30
अहमदनगर : रोस्टर तपासणीसाठी नाशिकला गेलेल्या दोन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा परत येताना वांबोरी फाट्याजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघातात मृत्यू ...
अहमदनगर : रोस्टर तपासणीसाठी नाशिकला गेलेल्या दोन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा परत येताना वांबोरी फाट्याजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तर एककर्मचारी जखमी आहे. अशोकराव परसराम व्यवहारे (वय 56) व विनायक कातोरे (43) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर संतोष लंके हे कर्मचारी अपघातात जखमी झाले.
व्यवहारे हे पशुसंवर्धन विभागात कक्ष अधिकारी, तर कातोरे हे महिला व बालकल्याण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. लंके हे पशुसंवर्धन विभागात लिपिक आहेत. शनिवारी (दि.13) सकाळी हे सर्व कर्मचारी आपापल्या विभागातील रोस्टर तपासणीसाठी खासगी कारने नाशिक विभागीय कार्यालयात गेले होते. काम संपवून परत येताना रात्री एकच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील वांबोरी फाट्याजवळ कार व मालवाहू ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात व्यवहारे व कातोरे या दोघांचा मृत्यू झाला.
लंके हे कार चालवत होते. एअरबॅग उघडल्याने ते बचावले, अशी माहिती मिळाली. त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्रीच दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती समजतात मोठ्या संख्येने जिल्हा परिषद कर्मचारी, तसेच अधिकारी जिल्हा रुग्णालयात जमले होते.