दुर्गम शिखरे पादाक्रांत करणारी सह्याद्रीकन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 03:54 PM2020-03-08T15:54:04+5:302020-03-08T15:55:22+5:30
ऊस तोड कामगारांची मुलगी अर्चना बारकू गडधे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या भावाच्या अपघाती मृत्युचे दु:ख विसरून आई-वडिलांचा मुलगा बनून सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक डोंगरकडे सर करण्याची किमया केली आहे़ आता ती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत आहे.
हरिहर गर्जे ।
पाथर्डी : ऊस तोड कामगारांची मुलगी अर्चना बारकू गडधे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या भावाच्या अपघाती मृत्युचे दु:ख विसरून आई-वडिलांचा मुलगा बनून सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक डोंगरकडे सर करण्याची किमया केली आहे. आता ती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत आहे.
जीवनातील संकटांना दुर्गम शिखरे समजून त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी अर्चनाने सह्याद्रीची कडे सर करत ट्रेकिंग करण्याचा मार्ग निवडला. आजपर्यंत वासीद (जि. ठाणे) येथील ३ हजार फूट उंचीचा वजीर सुळका सलग ३ वेळा सर करत विक्रम केला. रायगड किल्ल्याशेजारील समुद्र सपाटीपासून ३ हजार ५०० फूट उंचावर असलेला लिंगाणा अर्चनाने सहज सर केला. जीवधन किल्ल्याशेजारील ४५० फूट उंचीचे वानरलिंगी शिखरही तिने सर केले़. पुणे जिल्ह्यातील नानेघाटातील ३६० फूट उंचीचा नानाचा अंगठा, हरिहर किल्ल्याजवळील ४५० फूट उंचावरील स्कॉटीशकडा, मनमाड येथील १२० फुटावरील हडबीची शेंडी, माकडनाळ वाटेने सलग १९ तासाची यशस्वी चढाई करत हरिश्चंद्रगडही तिने सर केला आहे़. पॉर्इंट ब्रेक एडव्हेंचर ग्रुप नाशिक यांच्या मदतीने महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा नवीन विक्रम स्थापित करण्यासाठी वजीर सुळका सर करत आहे.
धुणीभांडी करून गाठले ज्ञानाचे शिखर
अर्चना ही पाथर्डी तालुक्यातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात कला शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत असून एनएसएसमधून २६ जानेवारी २०२० रोजीच्या दिल्ली राजपथ संचलनासाठीही तिची निवड झाली होती. कॉलेजमध्ये कमवा व शिका योजनेत काम करुन शिक्षणाचा खर्चही ती उचलण्याचा प्रयत्न करीत आहे़. तसेच महाविद्यालयातील शिक्षिकेच्या घरी धुणी, भांडी, स्वयंपाक करून अर्चना स्वत:च्या शिक्षणाला हातभार लावत आहे.