चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र लांबवणारे आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:47 PM2021-03-13T17:47:26+5:302021-03-13T17:48:29+5:30
मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली
कोपरगाव : महाशिवरात्रीनिमित्त घरात फराळ करीत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लुटून नेले. यावेळी तिच्या पतीला मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. लुटीतील मुद्देमालासह एक दुचाकी हस्तगत केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे गुरुवारी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी महिलेचे पती अशोक मारुती रांधवणे यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यंत्रणेमार्फत तपासाची सूत्रे हलविली. एक आरोपी हा गोधेगाव शिवारात संशयितरित्या लपलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव समाधान गोरख ठोंबरे (वय १९, रा. अंचलगाव, ता. कोपरगाव) असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार ऋषिकेश शंकर पैठणकर व राजेंद्र लक्ष्मण जाधव (दोघे रा. टाकळी, ता. कोपरगाव) यांनी केला असल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर पैठणकर व जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली.
आरोपींना शुक्रवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.