लॉकडाऊनमध्ये घरी येताच शेतकऱ्यांना ठगविणारा निमगाव वाघाचा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 17:51 IST2021-05-08T17:50:39+5:302021-05-08T17:51:09+5:30
अहमदनगर : पीक विमा मिळवून देतो, असे सांगून बनावट पावत्याद्वारे शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या ...

लॉकडाऊनमध्ये घरी येताच शेतकऱ्यांना ठगविणारा निमगाव वाघाचा आरोपी जेरबंद
अहमदनगर : पीक विमा मिळवून देतो, असे सांगून बनावट पावत्याद्वारे शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. लॉकडाऊनमुळे आरोपी घरी आला होता. हीच संधी साधत पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.
दीपक शिवाजी गायकवाड (वय २७, रा. निमगाववाघा, ता. नगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गायकवाड याच्या विरोधात १३ मार्च २०१९ रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. आरोपीचे निमगाव वाघा येथे महा-ई सेवा केंद्र होते. त्याचाच फायदा घेऊन आरोपीने पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पावत्या दिल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड फरार झाला होता. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे गायकवाड हा निमगाव वाघा येथील त्याच्या घरी आला असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना समजली होती. सानप यांच्यासह उपनिरीक्षक धनराज जारवाल, पोलीस नाईक शिंदे, मरकड, खेडकर यांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गायकवाड याने एकूण किती शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्याचा तपास सुरू आहे.