श्रीगोंद्यात पोलीस कोठडीतून आरोपी पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:09 PM2019-10-09T12:09:08+5:302019-10-09T12:09:15+5:30
दुहेरी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शंकर बारकू शिंदे (वय ५५) हा आरोपी बुधवारी पहाटे श्रीगोंदा पोलीस कोठडीची कौले तोडून फरार झाला. मात्र त्यास पोलिसांनी एका तासात पकडून पुन्हा जेरबंद केले.
श्रीगोंदा : दुहेरी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शंकर बारकू शिंदे (वय ५५) हा आरोपी बुधवारी पहाटे श्रीगोंदा पोलीस कोठडीची कौले तोडून फरार झाला. मात्र त्यास पोलिसांनी एका तासात पकडून पुन्हा जेरबंद केले.
शेडगाव येथील दुहेरी खून प्रकरणात शंकर शिंदे हा आरोपी आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी संध्याकाळी त्याने आजारी पडल्याचे नाटक केले. यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस कोठडी समोरील पडवीत ठेवले. याच संधीचा फायदा घेऊन त्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास पडवीच्या छतावरील काही कौले काढली. रात्री सामसूम झाल्यानंतर त्याने येथून धूम ठोकली. शिंदे पळाल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. त्याची शोधाशोध केल्यानंतर आरोपी शिंदे हा बोरुडेवाडी येथील एका लिंबोणीच्या बागेत लपला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने लगोलग जाऊन आरोपी शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली. दरम्यानच्या काळात पोलिसांची झोपच उडाली होती.
याप्रकरणी आरोपी विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संदीप पितळे करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.
....
सीसीटिव्ही कॅमे-याची तपासणी होणार
श्रीगोंदा येथील पोलीस कोठडीचे कौल काढून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी शंकर शिंदे पळून गेला. यावरुन पोलिसांच्या कारभाराचे पिळत उघडे पडले आहे. नेमणुकीवर असणारे पोलीस नेमके काय करत होते याचाही उलगडा होणे गरजेचे आहे. कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नेमका काय आणि कसा प्रकार घडला हे सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेजवरून समोर येण्यास मदत होणार आहे.