मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी हॉस्पिटलमधून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:18+5:302021-04-01T04:21:18+5:30
सुनील आडसरे हा वाळकी येथील कुख्यात गुंड विश्वजीत कासार याचा साथीदार आहे. कासार व त्याच्या साथीदारांनी वाळकी येथे १७ ...
सुनील आडसरे हा वाळकी येथील कुख्यात गुंड विश्वजीत कासार याचा साथीदार आहे. कासार व त्याच्या साथीदारांनी वाळकी येथे १७ नाेव्हेंबर २०२० रोजी ओंकार बाबासाहेब भालसिंग याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. उपचारादरम्यान ओंकार याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कासार याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्या टोळीविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात एलसीबी पथकाने आधी कासार याच्यासह त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. आडसरे मात्र सहा महिन्यांपासून फरार होता. आडसरे हा सुपा येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाती होती. माहितीनुसार उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार मन्सूर सय्यद, नानेकर, हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले आदींच्या पथकाने आरोपीस जेरबंद केले. आडसरे याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.