रेखा जरे हत्याकांडातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:42 PM2020-12-02T16:42:46+5:302020-12-02T16:43:27+5:30
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींना पारनेर न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींना पारनेर न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणाहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ मनिषा डुबे यांनी आरोपींच्या दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती़ न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़.
दरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी रात्री रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेक-यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलिस पथके रवाना करण्यात आली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेक?्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अटक केलेले दोघे कोल्हार येथील असून ते कोल्हार परिसरात लपून बसले होते. तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला होता. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत.