आरोपींवर ‘अॅट्रॉसिटी’तंर्गत गुन्हा दाखल करावा : खासदार अमर साबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:34 PM2019-06-10T12:34:38+5:302019-06-10T12:34:43+5:30
किरण उद्धव जगताप हा दलित आणि सर्वसामान्य आहे. तो आपले काहीच करू शकणार नाही याची जाणीव मारेकऱ्यांना होती़
अहमदनगर : किरण उद्धव जगताप हा दलित आणि सर्वसामान्य आहे. तो आपले काहीच करू शकणार नाही याची जाणीव मारेकऱ्यांना होती़ म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली़ पोलिसांनी या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी खासदार अमर साबळे यांनी केली़
साबळे यांनी रविवारी दुपारी नगर येथे मयत किरण याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले़ यावेळी बोलताना साबळे म्हणाले, किरण याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींविरोधात पुरावे एकत्र करावेत, तिघा आरोपींना अटक केली असली तरी या घटनेत आणखी आरोपी आहेत़ त्यांचा शोध घ्यावा़
या खटल्यात शासनाने उज्ज्वल निकम यांच्या दर्जाच्या सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे़ तसेच किरण याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे़ किरण याला मारहाण होऊन एक महिना उलटून गेला होता तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती़ याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे़ अपर पोलीस अधीक्षक यांच्यासोबत याबाबत चर्चा करणार असल्याचे साबळे यावेळी म्हणाले़ यावेळी वसंत लोढा, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सुवेंद्र गांधी, चंद्रकांत काळोखे आदी उपस्थित होते़दरम्यान या घटनेप्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढणार असल्याचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले़
काय आहे प्रकरण
नगर शहरातील पुणे बसस्थानकावर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिवनेरी बसचे तिकीट घेत असताना रांगेत किरण आणि जहागिरदार नावाच्या व्यक्तींमध्ये वाद झाला़ यावेळी जहागिरदार याने फोन करून काही तरुणांना बोलावून घेतले़ त्यांनी किरण याला लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण केली़ यात किरण याच्या डोक्याला गंभीर मार लागला़ त्याच्यावर एक महिन्यापेक्षा काळ जास्त हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ अखेर ४ जून रोजी किरण याचा मृत्यू झाला़