वाळू तस्करांवर होणार गुन्हा दाखल
By Admin | Published: June 27, 2016 12:47 AM2016-06-27T00:47:53+5:302016-06-27T00:59:40+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील हंगेवाडी शिवारात २९ मे रोजी वाळू उपसा करतानाच सोमनाथ सुपेकर या तरुणाचा मृत्यू झाला होता़ या मृत्युस कारणीभूत
श्रीगोंदा : तालुक्यातील हंगेवाडी शिवारात २९ मे रोजी वाळू उपसा करतानाच सोमनाथ सुपेकर या तरुणाचा मृत्यू झाला होता़ या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या वाळूतस्कराचे नाव पोलिसांनी डायरीवर घेतले असून याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात संबंधीत वाळू तस्करांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी केले आहे.
सोमनाथ सुपेकर हा २९ मे रोजी सकाळी शौचास गेला असता त्याचा माती व वाळुच्या डगरीखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिसांना दिली होती़ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वास्तविक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर यातील गौडबंगाल पोलिसांच्या लक्षात आले होते, मात्र वाळू तस्कराने या प्रकरणातून स्वत:चा गळा मोकळा करून घेण्यासाठी मयताच्या नातेवाईकास खोटी फिर्याद देण्यास भाग पाडले़ सोमनाथ सुपेकरचे घर ते घटनास्थळ हे जवळपास साडेतीन किलोमीटरचे अंतर आहे. घडलेली घटना आणि सांगितलेली घटना यामध्येही तफावत असल्याबाबत प्रकाश टाकला गेला.
पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमनाथ सुपेकर मृत्यू प्रकरणाचा फेरपंचनामा करण्याचे आदेश दिले़ पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी स्वत: घटनास्थळी जावून पाहणी केली असता, पोलिसांनी केलेला पंचनामा चुकीच्या पद्धतीने केला, हे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच सोमनाथचा मृत्यू हा वाळू उपसा करतानाच झाला असल्याचे त्यांच्या चौकशीत समोर आले.
(तालुका प्रतिनिधी)