आरोपींची होणार नार्को चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2016 01:02 AM2016-07-31T01:02:16+5:302016-07-31T01:04:58+5:30
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्याकांड प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, तपासी पथकाने या घटनेतील आरोपींच्या आता मानसशास्त्रीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्याकांड प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, तपासी पथकाने या घटनेतील आरोपींच्या आता मानसशास्त्रीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे़ शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाकडे आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी विनंती अर्ज करण्यात आला आहे़
आरोपींची संमती व न्यायालयाच्या निर्णयानंतर या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व कोपर्डी प्रकरणातील तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ कोपर्डी प्रकरणातील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ या तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे़
पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला़ तसेच घटनेची सविस्तर माहिती घेत या प्रकरणी पुरावे एकत्र केले आहेत़ आरोपींना घटनास्थळी पाहणाऱ्यांचीही साक्ष नोंदविण्यात आली आहे़ या आरोपींविरोधात सक्षम दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी या मानसशास्त्री चाचण्या करण्यात येणार आहेत़
(प्रतिनिधी)
आरोपींना न्यायालयीन कोठडी
कोेपर्डी प्रकरणातील दोन आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली़ आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ कोपर्डी घटनेतील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे तीनही आरोपी आता न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत़ त्यांची रवानगी कर्जत कारागृहात करण्यात आली आहे़ या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्यावर जिल्हा न्यायालय परिसरात दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी शनिवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता़
मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी आरोपींची परवानगी आवश्यक असते़ आरोपींची संमती मिळाली तरच या चाचण्या केल्या जातात़ न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कोपर्डी प्रकरणातील आरोपींची ‘नार्को’, ‘ब्रेन मॅपिंग’, ‘लायडिटेक्टर’, ‘पोलिग्राफ’ या चाचण्या घेण्यात येणार आहेत़