आचार्य तुषार भोसले म्हणतात...आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे आहे?; इंदोरीकर महाराजांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 02:58 PM2020-07-12T14:58:55+5:302020-07-12T15:00:17+5:30
शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला.
संगमनेर : शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला.
भोसले यांनी रविवारी (१२ जुलै) समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. त्यामुळेच आम्ही राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करावीत ही मागणी घेऊन राज्यपालांना भेटलो, असे आचार्य भोसले यांनी सांगितले.
राज्यात दारू दुकानांपासून सर्व उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. परंतू मंदिरे बंद असल्याने हरी लॉक आहे. महाराष्टÑ वगळता देशातील इतर राज्यांतील मंदिरे केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे देखील खुली करण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटलो, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, आकाश त्रिपाठी, भिखचंद मुठे यावेळी उपस्थित होते.