नेवासा तालुक्यातील ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:27 AM2018-05-24T10:27:17+5:302018-05-24T10:27:35+5:30
तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे.
नेवासा : तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. ओएस मशीनद्वारे लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वितरीत केले जाते. या प्रणालीतील गोंधळामुळे नेवासा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वितरीत होऊ शकले नाही. ज्या दुकानदारांच्या लाभार्थ्यांपैकी ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळाले नाही. त्या धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी श्री संदीप निचीत यांनी दिला असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली. नोटिसांवर कारवाई म्हणून तीन टप्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.
६ ते २० टक्के धान्य वाटप झालेली तालुक्यात २ दुकाने आहेत. त्यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले असून त्यांच्या दुकानावरील १०० टक्के ग्राहकांच्या कार्डाची तपासणी होणार आहे. दुस-या टप्यामध्ये २१ ते ५० टक्के धान्य वाटप झालेली ५३ दुकाने आहेत. त्यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे तर ५१ ते ७० टक्के धान्य वाटप झालेली ५५ दुकानदारांची ५० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.