काळाबाजार करणा-या ७ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:10 PM2020-04-25T17:10:57+5:302020-04-25T17:11:01+5:30
स्वस्त धान्य दुकानदारांनी काळाबाजार केल्याचे लक्षात आल्याने पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील ७ दुकानांवर कारवाई करण्यात आली.
अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानदारांनी काळाबाजार केल्याचे लक्षात आल्याने पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील ७ दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांनाच स्वस्त धान्य वितरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे ज्या-त्या स्वस्त धान्य दुकानांत गहू, तांदूळ आदी अन्नधान्य पोहोचही झाले आहे. परंतु यातही काही दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याच्या, तसेच काही ठिकाणी दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पुरवठा विभागाने पथकांमार्फत तपासणी करून दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ७ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील दोघांना अटकही करण्यात आली आहे. काहींना दंडात्मक कारवाई, तर काहींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तात्पुरती सोय म्हणून ही दुकाने इतर दुकानांना जोडण्यात आले आहेत.
कारवाई झालेली दुकाने
कैलास दादासाहेब बोरावके (कोपरगाव), कानिफ रामा आंधळे (पाथर्डी), वैशाली रवींद्र कांबळे (नगर तालुका), शिवनाथ म्हातारबा भागवत (संगमनेर), पंडित दीनदयाळ सोसायटी (संगमनेर), श्री संत भगवानबाबा म. ब.ग (जामखेड), शिल्पा पटेकर (जामखेड)