बदलीस अपात्र ६१ शिक्षकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 03:29 PM2018-08-02T15:29:45+5:302018-08-02T15:30:29+5:30
आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर : आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांच्या कारवाईचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी सादर केला.
शिक्षण विभागाकडून शिक्षकांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ही तपासणी सुरू होती. बुधवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली. शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींवर मध्यंतरी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान शिक्षकांनी दाखल नव्याने पुरावे दिले होते. परंतु, त्याची खात्री केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षण विभागाकडून ६१ शिक्षकांना आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा अशयाच्या नोटिसा पाठविल्या असून, उर्वरित २० शिक्षकांचा निकाल राखीव ठेवला आहे. त्यावर मुख्यकार्यकारी अधिका-यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.
आॅनलाईन बदली करताना संवर्ग १ व २ मधील शिक्षकांना प्राधान्य दिले गेले. त्याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतला. परंतु, त्यांच्यामुळे गैसोय झालेल्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर अक्षेप घेत तक्रारी केल्या़ त्याची दाखल जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली.
बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यांच्या जागी विस्थापित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. अमरावती जिल्हा परिषदेने बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या असून, त्यांच्या बदल्या दुर्गम भागात केल्या आहेत. त्यामुळे विस्थापितांच्या आशा पल्लवित झाल्या असून, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने अपात्र शिक्षकांवर काय कारवाई करतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
३२ शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणावर प्रश्न
जिल्ह्यातील २९ शिक्षकांनी दाखल केलेल्या आरोग्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने प्रमाणपत्र दिलेले शिक्षक ठणठणतीत असल्याचा अहवाल दिला आहे. उर्वरित संवर्ग २ मध्ये ३२ शिक्षक पती-पत्नींनी एकत्रिकरण झाले असून, त्यांनी दिलेले दाखले चुकीचे असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे ३१ शिक्षक पती-पत्नींच्या एकत्रिकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.