बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई तीव्र करणार : भानुदास पालवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:17 PM2018-08-10T17:17:28+5:302018-08-10T17:17:32+5:30
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांवर फौजदारी दाखल करण्याचेही आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले.
अहमदनगर : जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांवर फौजदारी दाखल करण्याचेही आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी सूचना केल्या.
जिल्ह्यात सध्या बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अशा ७१ डॉक्टर बोगस प्रॅक्टीस करताना आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाईनंतरही काही डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय थाटल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या होत्या. फळे कृत्रिमरित्या पिकवणा-यांवर कारवाई करण्याचा विषयही सदस्यांनी उपस्थित केला. यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून असे नमुने जप्त करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात ४५ इथेलीन चेंबर्स असल्याने आता अशा प्रकारे फळे कृत्रिमरित्या पिकवण्याचे प्रकार कमी झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील काही ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात टेक्निशीअन तसेच इतर पदे रिक्त असल्याने रुग्णांना त्रास होत असल्याची भूमिका काही सदस्यांनी मांडली. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याठिकाणचा आढावा घेऊन कार्यवाहीच्या सूचना पालवे यांनी दिल्या. दिव्यांगाला दिल्या जाणा-या दाखल्यांच्या अनुषंगाने राबविल्या जाणा-या प्रक्रियेत सोपेपणा आणण्याची सूचना यावेळी परिषदेच्या सदस्यांनी केली. बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी स्वतंत्र रांग अथवा व्यवस्था असली पाहिजे, असा नियम असताना काही बँका त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा बँकांची माहिती देण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँक अधिका-यांनी यावेळी केले. सध्या खरीप हंगाम सुरु असताना काही भागात जाणीवपूर्वक खतांचा तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात कृषी विकास अधिकारी आढावा घेतील.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच विलास जगदाळे, कारभारी गरड, उमा मेहेत्रे, अरुण कुलथ, डॉ. रजनीकांत पुंड, अशोक शेवाळे, प्रा. अमिता कोहली, सुभाष केकाण, अतुल कु-हाडे, शिवाजी साळुंखे, जालिंदर वाघचौरे, दिलीप भालसिंग, सुनीता खेडकर आदी उपस्थित होते.