आपटीचे माजी सरपंच व भाजप युवा मोर्चाचे सदस्य नंदू गोरे यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई, एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:57 PM2020-10-09T13:57:00+5:302020-10-09T14:21:16+5:30
भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत.
जामखेड : आपटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यातील धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर, अवैध धंदे, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती, कुविख्यात गुन्हेगार यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने जामखेड तालुक्यातील आपटी येथील नंदू गोरे याच्यावर सन २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये जामखेड पोलीस स्टेशनला मारामारी, आर्म ॲक्ट, धमकावणे, असे विविध प्रकारचे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी जामखेड येथील धोकादायक व्यक्ती म्हणून गोरे त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाठवला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अंतिम निर्णय घेऊन धोकादायक व्यक्ती म्हणून नंदू गोरे यास ८ ऑक्टोबर रोजी एक वर्षाकरीता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहे आहेत.