छावणी अनियमितेप्रकरणी महसूल अधिका-यांवरही कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 07:58 PM2018-02-25T19:58:38+5:302018-02-25T19:58:45+5:30
जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात सन २०१२-१४ मधील चारा घोटाळा २०० कोटींच्या पुढे असून त्याचे सर्व पुरावे आपण दिलेले आहेत. परंतु प्रशासनाने त्या कागदपत्रांच्या आधारे कारवाई केलेली नाही. १८८ कलमांद्वारे जी कारवाई करण्यात आली, ती कारवाई कोणत्याही कागदपत्राच्या वस्तुस्थितीला धरून नाही. या घोटाळ्यात तलाठी, मंडलाधिकारी असे महसूल अधिकारी, कर्मचारी, पशुसंवर्धन अधिकारी, तसेच मंत्रालयातील अधिकारी यांचाही हात असून त्यांच्यावर मात्र काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे घोटाळ्याची रक्कम या अधिकारी- कर्मचा-यांकडून वसूल करून सर्वांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गायके यांनी केली आहे.