निवडणुकीत पैसे देणा-या अन् घेणा-यांवरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:04 PM2018-12-07T16:04:52+5:302018-12-07T16:05:12+5:30
महापालिकेची निवडणूक पारदर्शी करण्यासाठी सर्वच प्रकारची खबरदारी घेतली जात असून जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
अहमदनगर : महापालिकेची निवडणूक पारदर्शी करण्यासाठी सर्वच प्रकारची खबरदारी घेतली जात असून जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तींच्या साडेचारशेहून अधिक लोकांना शहरातून हद्दपार करण्यात आलेले आहे. आताही पैशाचे, दारूचे किंवा इतर कोणतेही आमिष दाखवताना उमेदवार आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच. परंतु पैसे घेणाऱ्या मतदारांवरही आमचा वॉच असून प्रसंगी त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिला.
लोकमत फेसबुक लाईव्ह मुलाखतीमध्ये गुरूवारी दुपारी जिल्हाधिका-यांनी मनपा निवडणुकीसंदर्भात सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्यांच्याशी लोकमत टीमचा झालेला हा सविस्तर संवाद...
प्रश्न : नगरच्या निवडणुका नेहमीच दहशतीखाली होतात, प्रशासनाने या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला, याबाबत काय सांगाल?
महापालिका पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगावमध्ये एप्रिलमध्ये जी घटना झाली, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासन व पोलिसांनी असा निर्णय घेतला की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना शहरातून हद्दपार करायचे. अशा लोकांची एक यादी करून पोलिसांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे दिली व त्यांना निर्भिडपणे कारवाई करण्यास सांगितले. त्यामुळे कलम १४४ अन्वये साडेचारशे लोकांना तडीपार करण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, प्रशासन निवडणुकीबाबत खूपच गंभीर असल्याचा एक संदेश लोकांमध्ये गेला.
प्रश्न : निवडणुकीसाठी किती पथकांची स्थापना करण्यात आली, त्यांचे काम काय?
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाने आचारसंहिता कक्ष स्थापन केला असून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी त्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काही पथके स्थापन केली आहेत. जसे व्हिडिओ रेकॉर्डिंग पथक, फिरते पथक, उत्पादन शुल्क विभागाचे पथक आणि पोलिसांचे पथक. ही सर्व पथके शहरात फिरून सर्व स्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. उमेदवारांच्या प्रचारसभा, बैठका येथे पथकामार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तेथे आचारसंहितेचे उल्लंघन होतेय का याची पाहणी करणे. तसेच प्रभागात फिरून मतदारांना कोणी आमिष दाखवत असेल, दारू, जेवण वाटप होत असेल, तर हे पथक कारवाई करेल. याशिवाय उत्पादन शुल्क विभागाची टीम वेगवेगळे हॉटेल, परमिट रूममध्ये जाऊन तपासणी करून अटी-शर्तींचे उल्लंघन होत असेल तर त्वरित कारवाईची पावले उचलत आहे. पोलिसांनी जिल्ह्यात सहा स्पॉट निश्चित केले असून निवडणुकीच्या अनुषंगाने तेथे जर काही संशयित हालचाली झाल्या, तर त्वरित कारवाई केली जाईल.
प्रश्न : काही उमेदवार लोकांना पैसे वाटतात, तर काही लोकच पैसे मागतात, यावर कशी कारवाई होईल?
आमची टीम आहेच. परंतु जागृक नागरिकांनी याबाबत तक्रारी करणे गरजेचे आहे. पथकांचा संपर्क क्रमांक आम्ही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केला आहे. शिवाय मलाही थेट ७७५८०६०६०९ या क्रमांकावर काही तक्रारी असतील तर त्या कळवू शकता. त्याची लगेच दखल घेतली जाईल. यासाठी नागरिकांनी प्रशासनास मदत केली तर प्रशासनाचे काम आणखी हलके होईल.
प्रश्न : तक्रारीत तथ्य आढळले तर उमेदवारांवर त्याचा काय परिणाम होईल?
ज्या पक्षाविरूद्ध, उमेदवारांविरूद्ध कारवाई होईल, त्याचे नाव आम्ही प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करणार आहोत. जेणेकरून मतदारांना समजावे की संबंधित व्यक्ती प्रलोभन दाखवून मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मतपेटीतून कसे उत्तर द्यायचे ते मतदारांनी ठरवावे.
प्रश्न : मतदान यंत्रात गडबड होण्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. खरंच मतदान यंत्र किती सुरक्षित आहेत?
मतदान यंत्र शंभर टक्के सुरक्षित आहेत. यात कोणतीही छेडछाड करता येत नाही. सर्व यंत्रांची तपासणी अगोदरच उमेदवारांच्या उपस्थितीत केली जाते. मतदानानंतरही उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मशीन सील केले जातात. यात कोणतीही गोष्ट लपवून केली जात नाही. मतदान यंत्रांत कोठेही इंटरनेटचा वापर केला जात नाही. त्यामुळे हॅकिंगचे प्रकार होत नाहीत. निवडणूक आयोगाचे मशीन्स पूर्णत: वेगळे असतात. त्याला खासगी व्यक्ती हाताळू शकत नाही. एकूणच सर्व प्रक्रिया उमेदवारांसमोरच केली जात असल्याने यात शंका घेण्यास वाव नाही.
प्रश्न : मतदार मतदानासाठी कोणते कागदपत्र वापरू शकतात?
एकूण १७ प्रकारचे ओळखपत्र दाखवून लोक मतदान करू शकतात. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मनपाने शहरात अनेक ठिकाणी जनजागृतीपर पोस्टर्स लावली आहेत. खासगी, सामाजिक संस्थांकडून मदत घेत पथनाट्यासारखे उपक्रम राबवून लोकांना १०० टक्के मतदान करण्यास सांगणार आहोत. लोकांना यावेळी निवडणूक आयोगाने चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जर ‘नोटा’ला सर्वाधिक मते पडली, तर अशा जागेवर पुन्हा निवडणूक होणार आहे. यातून मतदारांना चांगला पर्याय निवडता येईल.
प्रश्न : निवडणूक काळात बँक अकाऊंट तपासण्याची मोहीम काय आहे?
यामध्ये आम्ही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. यात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, तसेच पतसंस्थांकडून दैनंदिन व्यवहाराची माहिती मागवली आहे. एखाद्या खात्यात अनेक दिवसांतून अचानक मोठा व्यवहार झाला किंवा एकाच व्यक्तीच्या खात्यातून एकाच वेळी अनेक खात्यांत पैसे गेले, तर अशी खाती तपासून ते उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहेत का याची खात्री केली जाईल. त्यानंतर संबंधितांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल.
प्रश्न : उमेदवार खर्चावर प्रशासनाचे कसे नियंत्रण आहे?
उमेदवार प्रचारासाठी जे खर्च करतात, तो त्यांना ट्रू व्होटर अॅपवर देणे बंधनकारक आहे. याशिवाय आमचे पथकही या खर्चावर लक्ष ठेवून असते. दैनंदिन याचा आढावा घेतला जातो, यात तफावत आढळली तर मात्र उमेदवारांवर कारवाई होईल.
प्रश्न : जर निवडणुकीत मतदारांनी पैसे स्वीकारले तर त्यांच्यावर कारवाईची काय तरतूद आहे?
मुळात मतदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ते या लोकशाही प्रक्रियेचा भाग आहेत. आपण जो उमेदवार निवडून देणार आहात, तो कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय, तो आपल्या प्रभागासाठी काय करणार, याची खात्री करूनच आपले बहुमोल मत दिले पाहिजे. याउपरही उमेदवार किंवा मतदार यांनी गैरप्रकार केला तर त्यांच्यावर कारवाई होईल.
१०० टक्के मतदान करा
जागृक लोक आहेत म्हणून लोकशाही आहे. नागरिकांनी असे समजू नये की निवडणूक प्रक्रियेशी आपला संबंध नाही. आपण या देशाचे नागरिक आहोत. आपण नशीबवान आहोत की आपली लोकशाही समृद्ध आहे. अजूनही शेजारील काही देशांत स्थिर लोकशाही नाही. त्यामुळे मतदानाचा पवित्र हक्क सर्वांनीच बजवावा.
आयुक्त-जिल्हाधिकारी दुहेरी कसरत
आयुक्त हे पूर्णवेळ पद आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर मोठा जिल्हा आहे. दोन्हीकडची स्थिती हाताळताना थोडा ताण येतो, पण दोन्ही विभागांच्या प्रशासकीय सहकाºयांचे चांगले सहकार्य मिळते, त्यामुळे दोन्ही जबाबदाºया सोप्या होतात. आयुक्तपदाच्या अनुभवाचा भविष्यात फायदा होईल. यापूर्वी मी कोणत्याही मोठ्या निवडणुकीतथेट सहभागी नव्हतो. ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. हा चांगला अनुभव आहे. नगर शहरासह जिल्ह्यात शिकण्यासारखे खूप आहे. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी मला या निवडणुकीचा फायदा नक्कीच होईल, असेही जिल्हाधिकाºयांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.