दोन गुन्हे असलेल्या वाळूतस्करांवर होणार ‘एमपीडीए’ ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:36 PM2019-06-26T13:36:54+5:302019-06-26T13:37:54+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाळूतस्करांविरोधात चांगलाच फास आवळला आहे़ दोन गुन्हे दाखल असलेल्या तस्करांविरोधात एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सिंधू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत़
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाळूतस्करांविरोधात चांगलाच फास आवळला आहे़ दोन गुन्हे दाखल असलेल्या तस्करांविरोधात एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सिंधू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत़
गेल्या साडेतीन महिन्यात पोलिसांनी जिल्ह्यात विविध तालुक्यांत २११ ठिकाणी छापे टाकून ३०० पेक्षा जास्त वाळूतस्करांवर गुन्हे दाखल केले आहेत़ या आरोपींना न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा वाळूतस्करीत सक्रिय होतात़ त्यामुळे प्रश्न जैसे थे च राहतो़ एमपीडीए अंतर्गत कारवाई केली तर आरोपीला एक वर्ष तुरुंगात स्थानबद्ध केले जाते.
वाळूतस्करांवर कायद्याचा धाक निर्माण व्हावा, यासाठी गुन्ह्यांचे स्वरुप पाहून एमपीडीए, मोक्का व इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे़ पोलिसांनी अवैध वाळूउपशाविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत़
गुन्हेगारांविरोधात मोक्का अथवा एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करताना काही त्रुटी राहिल्या तर याचा आरोपींना फायदा होतो़ त्यामुळे असे प्रस्ताव अचूक तयार करुन गुन्हेगारांवर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकारी व असे प्रस्ताव तयार करणारे दुय्यम अधिकारी, कर्मचारी यांना नगर येथे एक दिवसाचे प्रशिक्षण दिले़
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायदा करण्यात आला. यात आरोपीला एका वर्षासाठी स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येते. याविरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयात दाद मागता येते.