‘साईकृपाच्या’च्या स्पिरिट तस्करीतील सर्व दोषींवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:24+5:302020-12-30T04:28:24+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राहाता तालुक्यातील बाभळेश्वर टोल नाक्याजवळ १४ मार्च रोजी एका ट्रकमधून १८ हजार लिटर स्पिरिट ...
उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राहाता तालुक्यातील बाभळेश्वर टोल नाक्याजवळ १४ मार्च रोजी एका ट्रकमधून १८ हजार लिटर स्पिरिट जप्त केले होते. या गुन्ह्यात आतापर्यंत इंद्रसिंग गुलाब भिल, चंदू अर्जुन वानखेडे, सुधाकर एकनाथ ससे, दादाराम तुकाराम ओहोळ व राजकुमार सुदाम ढमढेरे यांना अटक करण्यात आलेली आहे. हे स्पिरिट साईकृपा शुगर कारखान्यातून घेतल्याचे तपासात समोर आले. हे स्पिरिट दारू निर्मितीसाठी वापरले जाणार होते. या गुन्ह्यात (जि.धुळे) येथील बिजू बागले व योगेश राजपूत व इतर काही नावे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्याची कारवाई तपासी अधिकारी करीत आहेत. सदर गुन्हा सध्या तपासावर असून यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करून लवकरच गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे याबाबत विभागाची भूमिका स्पष्ट व्हावी आणि नागरिकांच्या मनात विभागाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण होऊ नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------------
‘लोकमत’चा पाठपुरावा
उत्पादन शुल्कने अवैध स्पिरिट पकडले. मात्र, हे स्पिरिट कोणत्या कारखान्यातून खरेदी करण्यात आले व कोठे जात होते ही बाब बरेच दिवस समोर आली नव्हती. याबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर या गुन्ह्यात साईकृपा कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार ढमढेरे यांच्यावर गुन्हा दाखल होत त्यांना अटक झाली. आता तपासात आणखी कुणावर गुन्हा दाखल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.