शिक्षकावर होणार कारवाई
By Admin | Published: May 13, 2014 11:42 PM2014-05-13T23:42:26+5:302023-08-10T11:45:07+5:30
बदली टाळण्यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कोपरगाव तालुक्यातील एका शिक्षकाने अपंगत्व प्रमाणपत्रात खाडाखोड करत, अपंगत्वाची टक्केवारी वाढविली असल्याचे उघड झाले आहे.
अहमदनगर : बदली टाळण्यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कोपरगाव तालुक्यातील एका शिक्षकाने अपंगत्व प्रमाणपत्रात खाडाखोड करत, अपंगत्वाची टक्केवारी वाढविली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी रुबल अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतांना अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत अधिक माहिती अशी कोपरगाव तालुक्यातील चंद्रकांत माळी या शिक्षकाने आपल्या अपंगत्वाच्या प्रमाणात खाडाखोड केलेली आहे. त्याच्याकडे ३० टक्के अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र होते. त्यात त्याने खाडाखोड करत ४० टक्के अपंगत्व करून घेतले. विशेष म्हणजे त्याने २००५ ते २००९ या कालावधीत त्या प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेला आहे. ही बाब कोपरगावचे गटशिक्षणाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शिक्षणाधिकार्यांना संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शिक्षणाधिकारी गोविंद आणि त्यांचे सहकारी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेलेही. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.सदर प्रकरण हे कोपरगाव येथील असल्याने गुन्हा देखील कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे कोतवाली पोलिसांनी सुचविले आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्रस्ताव पाठविला असून त्यांची मान्यता मिळताच संबधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) चौैकशी पूर्ण बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणार्या शिक्षकांपैकी १६ प्राथमिक शिक्षकांची चौकशी पूर्ण झालेली आहे. या शिक्षकावर येत्या आठवड्यात प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकांवर सौम्य स्वरूपात कारवाई करावी यासाठी राजकीय दबाब वाढत आहे. सोमवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एक विद्यमान उमेदवाराने मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची भेट घेवून शिक्षकावरील कारवाई टाळण्याची मागणी केली आहे. काही जिल्हा परिषद सदस्य अशी मागणी करत आहेत. राजकीय दबावाच्या वृत्ताला नवाल यांनी दुजोरा दिला आहे.