आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’
By Admin | Published: September 4, 2014 11:09 PM2014-09-04T23:09:37+5:302023-11-03T15:12:06+5:30
रियाज सय्यद, संगमनेर शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे.
रियाज सय्यद, संगमनेर
पठार भागात अकलापूरच्या अतिदुर्गम साडेसात एकर खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे.
‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ध्येय घेवून १० आॅक्टोबर १९८९ रोजी आश्रमशाळेची स्थापना झाली. आश्रमशाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रमांद्वारे ‘उपक्रमशील शाळा’ म्हणून प्रतिमा तयार केली. प्रारंभी १ ते ७ वीपर्यंत वर्ग होते. आज १२ वी कला व विज्ञान शाखांचे वर्ग भरतात. सुमारे ६०० आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. साडेसात एकर खडकाळ भागावर वृक्षराजींचे संगोपन करून परिसर हिरवागार केला आहे. ‘रद्दीतून ग्रंथालय’ या उपक्रमाद्वारे वर्तमानपत्रातील अभ्यासपूरक माहिती संकलित करून पुस्तिका तयार केली. ‘कचरामुक्त शाळा’ उपक्रमातून शाळा परिसर स्वच्छतेचा पायंडा पाडला आहे. ‘गांडूळखत’ प्रकल्पाद्वारे शाळेतील ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. शेवगा, सुबाभूळ, अशोका, करंज, फुलझाडे, औषधी वनस्पती आदी प्रकारच्या झाडांची तयार केलेली ‘ट्री बँक’(रोपवाटिका) अतिशय सुंदर आहे. रोज पहाटे ५ वाजता स्वत: मुख्याध्यापक जी. डी. भांड विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगा व प्राणायाम करून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते. शाळेच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक असून कल्पना केदार, सुनंदा भगत हिने धावण्यात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना येथे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘भरारी’ या वार्षिक नियतकालिकातून शाळेचा लेखा-जोखा मांडला जातो. डिजीटल जमान्यात ‘वेबसाईट’ सुरू करणारी ही एकमेव शाळा आहे. दहावी व बारावीचे निकाल सतत ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. सन २०१२-१३ मध्ये सचिन दळवी हा (१२वी कला) विद्यार्थी ८० टक्के गुण मिळवून आदिवासी विभागात पहिला आला. नावीन्यपूर्ण उपक्रम व भौतिक सुविधांमुळे शाळेला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार मिळाला आहे.
किशोरवयीन मुलींची आरोग्य व रक्तगट तपासणी, स्वसंरक्षणाचे धडे, मार्गदर्शनपर व्याख्याने, लेक वाचवा पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, सुसज्ज व्यायामशाळा, पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय, विद्यार्थी नियतकालिके, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण संदेश नाटिका, क्षेत्रभेटी, वनभोजन, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत पाझर तलाव निर्मिती ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.