शिलधी प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला माणुसकीची जोड; लॉकडाऊनमध्ये विविध घटकांना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 01:13 PM2020-06-05T13:13:34+5:302020-06-05T13:14:34+5:30
साईबाबांवरील श्रद्धेतून सेवाकार्य करणा-या येथील शिलधी प्रतिष्ठानने कोरोनाच्या महामारीत अनाथ, वृद्ध, डॉक्टर्स, पोलीस, नगरपंचायत, नाट्य कलाकार आदींच्या कार्याला यथाशक्ती हातभार लावून साईबाबांच्या शिकवणुकीला उजाळा दिला आहे.
शिर्डी : साईबाबांवरील श्रद्धेतून सेवाकार्य करणा-या येथील शिलधी प्रतिष्ठानने कोरोनाच्या महामारीत अनाथ, वृद्ध, डॉक्टर्स, पोलीस, नगरपंचायत, नाट्य कलाकार आदींच्या कार्याला यथाशक्ती हातभार लावून साईबाबांच्या शिकवणुकीला उजाळा दिला आहे.
शिलधीचे संस्थापक राजेंद्र कोते व अध्यक्ष तुषार शेळके गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोरोनाच्या महामारीत त्यांच्या या सेवाकार्याना माणुसकीची जोड मिळाली. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या शिलधीने पीपीई कीटचा तुटवडा असताना एक लाख रुपये खर्चून पालघरहुन संस्थान रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी शंभर कीट आणले.
पोलीस, नगरपंचायत व माध्यम प्रतिनिधींना पंचवीस हजारांचे मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज भेट दिले. लॉकडाऊनमध्ये रक्ताचा तुटवडा असतांना साईनाथ रूग्णालयात पन्नास कार्यकर्त्यांनी रक्तदान करून माणुसकीचा वसा जपला. याच काळात येथील साई आश्रयामधील सव्वाशे मुलांना हापूस आमरसाची मेजवानी असो, गरजुंना किराणा साहित्याचे वाटप असो. संस्थान रूग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी कपड्यांसह बेबी कीटची भेट असो़ अशा आगळ्यावेगळ्या सेवाकार्यातून शिलधीच्या संवेदनशीलतेची ओळख झाली.
शिर्डी शहरातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी शिलधीने नगरपंचायतीला सर्वप्रथम आठ व पोलीस स्टेशनला चार आॅक्सीमीटर भेट दिले. शहरातील डॉक्टर, बँक कर्मचारी व प्रशासकीय अधिका-यांना सुरक्षेसाठी फेस शिल्ड व हॅन्ड वॉशबरोबरच नागरिकांच्या वतीने ऋतज्ञता पत्रही दिले.
अहमदनगरजवळील माऊली सेवा संस्थेला १० हजार रुपयांहून अधिक किमतीचे आवश्यक साहित्य तसेच विविध दात्यांच्या माध्यमातून २ लाख रुपयांचे आवश्यक साहित्य मिळवून दिले. गो-शाळेला पाण्यासाठी आर्थिक मदत, गरजू कुटुंबाना होमिओपॅथी औषधांचे वाटप केले. अखिल भारतीय नाट्य महामंडळाकडे कलाकारांसाठी आर्थिक मदत पाठवली.
प्रशासनातील अधिका-यांच्या परिश्रमाची दखल घेत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून साईबाबांची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे भेट स्वरुपात दिले.
संकटात आपणच परस्परांच्या पाठिशी उभे रहायचे असते. या संकटाने खूप काही शिकविले. साईबाबांच्या सेवाकार्यातून प्रेरणा घेवून आम्ही हे छोटेसे काम करीत आहोत. प्रत्येक उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य तन-मन-धनाने सहभागी असल्यानेच हे शक्य होते.
-तुषार शेळके, अध्यक्ष, शिलधी प्रतिष्ठान, शिर्डी.