प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले-बाळासाहेब थोरात; नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:22 PM2020-05-15T15:22:00+5:302020-05-15T15:24:38+5:30
देशात, राज्यात कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही नियमांसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण त्यांना सहकार्य करा, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर : देशात, राज्यात कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही नियमांसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण त्यांना सहकार्य करा, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
येथील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या प्रांगणात शुक्रवारी महसुलमंत्री थोरात यांनी फिजीकल डिस्टन्स ठेवत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.
मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक, कुरण येथील परिस्थितीची माहिती घेत तेथील नागरिकांची गैरसोय होवू नये याकरिता प्रशासनाला सूचना केल्या. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहून करीत आहोत. या संकटात महसूल, पोलीस आणि आरोग्य विभाग प्रभावीपणे काम करीत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करीत गोरगरिब, गरजू नागरिक, मजूर, परराज्यातील कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे कार्य कौतूकास्पद आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ बुद्रूक, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन देखील थोरात यांनी केले.
ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. संगमनेर शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिट पुरविण्याचे काम करीत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा आॅनलाईन मागणीद्वारे पुरविले जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.