संगमनेर तालुक्यात प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये; १४ ठिकाणी कलम १६३ लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:19 IST2025-02-19T15:18:59+5:302025-02-19T15:19:26+5:30
महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला करत अंगावर जेसीबी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

संगमनेर तालुक्यात प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये; १४ ठिकाणी कलम १६३ लागू
संगमनेर : अवैधरीत्या वाळूउपसा आणि वाळू वाहतूक होणाऱ्या संगमनेर तालुक्यातील प्रवरा परिसरातील १४ ठिकाणी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३चे कलम १६३ लागू केले आहे.
तालुक्यातील प्रवरा, मुळा, म्हाळुंगी या नद्यांच्या पात्रातून अवैधरीत्या बेसुमार वाळूउपसा करीत विविध प्रकारच्या वाहनांमधून वाळूची वाहतूक केली जाते. वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या पथकावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवैधरीत्या वाळूउपसा आणि वाळू वाहतुकीच्या संदर्भाने कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला करत अंगावर जेसीबी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत येथे कलम लागू
१) धांदरफळ येथील प्रवरा नदीकाठ परिसर, २) मंगळापूर येथील प्रवरा नदीकाठ परिसर, ३) खांडगाव निमज शिवरस्ता परिसर, पाटील मळा परिसर, खांडगाव ओढा डेअरी पाठीमागील रस्ता परिसर, ४) प्रवरा नदीवरील मोठा पूल परिसर, गंगामाई घाट परिसर, नर्सरी परिसर, ५) कासारा दुमाला येथील प्रवरा नदीवरील पूल परिसर, ६) वाघापूर येथील ओढा, ७) जोर्वे, पिंपरणे, कनोली, रहीमपूर.
दरम्यान, "काही अज्ञातांकडून पाळत ठेवून वारंवार हल्ले करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. नदीपात्राच्या लगत रात्रीच्या वेळी जमाव जमा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो," असं उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी म्हटलं आहे.