रुग्णांच्या उपचारावर आता प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:13+5:302021-04-01T04:22:13+5:30
अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त ...
अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी जारी केले आहेत. दरम्यान, चाचण्या, लसीकरणासाठी गर्दी वाढत असून नागरिकांच्या तक्रारीही वाढल्याने जिल्हाधिकारी आता संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर करडी नजर ठेवून यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.
कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे यासाठी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) अजित थोरबोले, बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), कंटेनमेंट आणि मायक्रो कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटबाबत समन्वय साधून जबाबदारी पार पाडण्याकरिता उपजिल्हाधिकारी (रोहयो) उदय किसवे आणि जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीएचसी) आणि डीसीएचमधील रुग्णांसाठीच्या खाटांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना साहाय्य करण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी थोरबोले यांना साहाय्य करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमदाडे, तहसीलदार (पुनर्वसन) आर. बी. वारुळे, अव्वल कारकून (भूसंपादन) शुभांगी बेदरे, महसूल सहायक भूसंपादन मंगेश ढुमणे आणि रेणुका येंबारे यांचा समावेश आहे. उदय किसवे यांना साहाय्य करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, तहसीलदार (सामान्य प्रशासन) वैशाली आव्हाड, नायब तहसीलदार (रोहयो) आर. ए. भालसिंग, नायब तहसीलदार निवडणूक प्रशांत गोसावी, लेखाधिकारी (रोहयो शाखा) दिलीप दुर्गे यांचा समावेश आहे.
ऊर्मिला पाटील यांना साहाय्य करण्यासाठी मनपा उपायुक्त (कर) यशवंत डांगे, तहसीलदार (भूसुधार) श्रीमती एस. डी. जऱ्हाड, तहसीलदार (निवडणूक) चंद्रशेखर शितोळे, अव्वल कारकून (कुळकायदा शाखा) विशाल नवले, किरण देवतरसे, शेखर साळुंके, महसूल सहायक (करमणूक कर) आशा गायकवाड, प्रशांत बारवकर आणि लक्ष्मण बेरड (कुळकायदा शाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.