मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:31 AM2019-04-20T11:31:17+5:302019-04-20T11:32:55+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे़
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे़ मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे़ नगर शहरातील ३० मतदार केंद्रासह जिल्ह्यातील एकूण ३६६ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे़
भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंहन यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला़यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या पोलीस विभागाच्या निरीक्षक भवानीश्वरी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे आदी उपस्थित होते़
यावेळी बोलताना नरसिंहन म्हणाले, आता प्रत्यक्ष निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याइतकीच महत्वाची भूमिका क्षेत्रीय अधिकारी आणि मतदान केंद्रांवरील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांची आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसार प्रत्येकाने काम करणे अपेक्षित आहे. मतदानाच्या दिवशी उमेदवार अथवा राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल करणे गरजेचे आहे. त्यानंतर ठीक ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरु होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नगर मतदारसंघासाठी २ हजार ३० तर शिर्डी मतदारसंघात १ हजार ७१० मतदान केंद्र आहेत़
प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्ष, पोलीस कर्मचारी असे एकूण सहा अधिकारी राहणार आहेत़