शिर्डीतील बेघर अपंगाला प्रशासनाने पाठविले दिल्लीला; माणुसकीचे घडविले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:08 PM2020-06-01T17:08:37+5:302020-06-01T17:09:55+5:30
शिर्डीतील एका निराधार अपंगाला राहाता तहसीलदार व शिर्डी पोलिसांनी सोमवारी दिल्लीला पाठवून प्रशासनातील माणुसकीचा परिचय दिला आहे.
शिर्डी : शिर्डीतील एका निराधार अपंगाला राहाता तहसीलदार व शिर्डी पोलिसांनी सोमवारी दिल्लीला पाठवून प्रशासनातील माणुसकीचा परिचय दिला आहे.
सागर परिहार असे या ४५ वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. मूळचा दिल्लीचा व सुशिक्षित असलेला सागर शिर्डीत येण्यापूर्वी वसईला राहात होता. अपंग असलेला सागर लक्ष्मीनगरच्या पुलाजवळ बसून साईबाबांचे लॉकेट विकून आपली उपजीविका चालवत होता. कोरोनातील लॉकडाऊनने शिर्डीतील इतरांप्रमाणे त्याचा रोजगारही हिरावला गेला. कसेबसे दोन महिने काढल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याने राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनाच फोन केला. आपले हाल होत असून दिल्लीला जायचे असल्याचे त्याने सांगितले. यावर हिरे यांनी त्याला किराणा देण्याची तयारी दर्शविली.
हिरे यांनी सागरच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. डॉ़ संजय गायकवाड यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. यानंतर तहसीलदार हिरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांच्याशी चर्चा करून सागर परिहारची अडचणही सांगितली. यानंतर शिर्डी पोलिसांनी त्याला पत्र देत एका खासगी वाहन चालकाला विनंती करून त्याची दिल्लीला जाण्याची व्यवस्था करून दिली. प्रशासनाकडून इतकी माणुसकी अभिप्रेत नसलेल्या सागरला निघतांना अश्रू अनावर झाले.