वडगाव पानच्या उपबाजार समितीत कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:25+5:302021-05-28T04:16:25+5:30

केडगाव : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत गुरुवारपासून (दि. २७) टोमॅटो लिलावाला सुरुवात करण्यात आली ...

Admission to Wadgaon Pan's sub-market committee only after corona test | वडगाव पानच्या उपबाजार समितीत कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

वडगाव पानच्या उपबाजार समितीत कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

केडगाव : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत गुरुवारपासून (दि. २७) टोमॅटो लिलावाला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत लिलाव होणार आहेत, तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपबाजार समितीत येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २५ दिवसांपासून बंद असणारा नगर बाजार समितीचा नेप्ती उपबाजार भाजीपाला व फळांच्या खरेदी-विक्रीने गजबजून गेला. बुधवारी (दि.२६) पहिल्याच दिवशी ३० टक्केच आवक झाली. कोरोनाच्या नियमांचे कडक पालन व्हावे, यासाठी पोलीस बंदोबस्तात व्यवहार पार पडले. जिल्ह्यात इतर बाजार समित्याही टप्प्याने सुरू होत आहेत.

१ मे पासून नगर बाजार समितीमधील मुख्य बाजाराबरोबरच नेप्ती उपबाजार समितीत चालणारा फळे व भाजीपाला बाजार बंद केला होता. नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत भाजीपाला व फळे बाजार भरविण्यास परवानगी दिली. त्यासाठी काही अटी व शर्तींचे नियम घालून दिले. त्याची अंमलबजावणी करीत नेप्ती उपबाजार येथे फळे व भाजीपाला बाजार भरविण्यास सुरुवात केली. खरेदीदार व आडतदार यांनी नियमांचे कठोर पालन करावे, यासाठी पोलीस बंदोबस्तात बाजार भरविला गेला. यासाठी प्रथम समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड चाचणी घेण्यात आली. आत येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान व ऑक्सिजन पातळी यांचीही तपासणी करण्यात आली. सकाळी २३३ क्विंटल इतक्या भाजीपाल्याची आवक झाली तर ३६ क्विंटल फळांची आवक झाली.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत गुरुवारपासून टोमॅटो लिलावाला सुरुवात झाली. येथे येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. सध्या टोमॅटोचा सिझन असून, हा शेतमाल अत्यंत नाशवंत आहे. तो एक-दोन दिवसाच्या पुढे टोमॅटो टिकणे शक्य नाही. त्यामुळे वडगावपान येथील उपबाजार समितीत टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यास परवानगी मिळावी, असे पत्र बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी जिल्हाधिकारी, सहकारी संस्थांचे जिल्हा निबंधक यांना पाठविले होते. त्यानुसार लिलावाला परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Admission to Wadgaon Pan's sub-market committee only after corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.