प्रगत शाळा स्पर्धेत राज्यात नगर प्रथम
By Admin | Published: April 26, 2016 11:20 PM2016-04-26T23:20:57+5:302016-04-26T23:26:05+5:30
अहमदनगर : शासनाने शैक्षणिक गुणवत्तेच्या घेतलेल्या प्रगत शाळा स्पर्धेत नगर जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावून राज्यात पहिल्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे.
अहमदनगर : शासनाने शैक्षणिक गुणवत्तेच्या घेतलेल्या प्रगत शाळा स्पर्धेत नगर जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावून राज्यात पहिल्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे. जिल्ह्यातील १ हजार ३५५ शाळा प्रगत झाल्या असून अकोले आणि जामखेडसारख्या मागास तालुक्यातील शाळांनी या उपक्रमात आघाडी घेतली आहे.
२२ जून रोजी शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला आहे. यानंतर राज्यात शैक्षणिक गुणवत्तेची चळवळच सुरू झाली. यात २३ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान प्रगत शाळा उपक्रम हाती घेण्यात आला. यापूर्वी शासनाने शाळांच्या भौतिक व गुणवत्तावाढीसाठी केलेल्या कामाची प्रगती तपासण्यासाठी ‘प्रगत शाळा’ परीक्षा घेतली. २५ निकषांच्या आधारावर शाळेला ८० गुण मिळाल्यास व संकलीत दोनच्या चाचणीत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला कि मान ४० टक्के गुण प्राप्त झाल्यास ती शाळा २०१५-१६ करिता प्रगत म्हणून घोषित करण्यात आली. यात राज्यातील १३ हजार ९४२ शाळा प्रगत शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्हा १ हजार ३५५ शाळांसह पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असून येथील १ हजार ३१८ शाळा प्रगत आहेत.
जिल्ह्यात ३ हजार ६०६ प्राथमिक शाळा आहेत. यातील १ हजार ३५५ शाळा प्रगत झाल्या आहेत. हा आकडा १५ एप्रिलपर्यंतचा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक प्रगती योग्य दिशेने सुरू आहे. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, गुलाब सय्यद यांच्या मार्गदर्शनाने अकोले, जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यात शंभरहून अधिक शाळा प्रगत आहेत. श्रीरामपूर, पारनेर आणि कोपरगाव तालुक्यांची घोडदौड सुरू आहे.
(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील प्रगत शाळांची कामगिरी चांगली आहे. लवकर या शाळांना भेटी देवून तेथील प्रगती समजावून घेणार आहे. भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अधिकाधिक उपक्रम राबवून त्या प्रगतीशील करण्यात येणार आहेत.
-शैलेश नवाल,
मुख्य कार्यकारी अधिकारी.