गिर्यारोहकांची साहसी मोहीम कोविडयोद्धांना समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:33+5:302021-04-10T04:21:33+5:30
नेवासा फाटा : सह्याद्री खोऱ्यातील आरोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जाणारा ५५० फूट उंची असलेला स्कॉटिश कडा अहमदनगरच्या चांदबिबी मॉर्निंग ...
नेवासा फाटा : सह्याद्री खोऱ्यातील आरोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जाणारा ५५० फूट उंची असलेला स्कॉटिश कडा अहमदनगरच्या चांदबिबी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य नरेंद्र लोळगे, व्यंकटेश बाले व भानसहिवरा, ता. नेवासा येथील अभय मुथ्था या गिर्यारोहकांनी सर केला. ही साहसी मोहीम गिर्यारोहकांनी कोविडयोद्धांना समर्पित केली.
नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावरील (३६७६ फूट) ८० अंशातील कातळ पायऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी अनेक जण येथे आवर्जून येतात; परंतु यापेक्षा रोमांचक थरार देणारा स्कॉटिश कडा हा साहसी गिर्यारोहकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. हा कडा सर करण्याची मोहीम हर्षेवाडी (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथून सुरू झाली. एक तासाची पायपीट करून कड्याच्या पायथ्याशी पोहोचून पूजन करून शिवगर्जना देत आरोहणाला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेसाठी जॉकी साळुंखे, चेतन शिंदे, चेतन बेंडकोळी, ऋषी पोखरणा, अर्चना गडदे, डॉ. समीर भिसे, चांदबिबी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य शांतनू मोहरे, दादा भाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.