तब्बल २० वर्षानंतर प्रकल्पग्रस्तांना भरपाई
By Admin | Published: October 15, 2016 12:35 AM2016-10-15T00:35:05+5:302016-10-15T00:54:40+5:30
जामखेड : तालुक्यातील मुंजेवाडी लघु पाटबंधारे तलावामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल वीस वर्षानंतर न्याय मिळाला.
जामखेड : तालुक्यातील मुंजेवाडी लघु पाटबंधारे तलावामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल वीस वर्षानंतर न्याय मिळाला. जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यात लक्ष घालून विशेष निधीची तरतूद करून तब्बल १ कोटी १ लाख २२ हजार ४८३ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली.
प्रकल्पग्रस्तांना भूसंपादन भरपाई देण्याचा निर्णय गुरूवारी जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी गुरूवारी मंत्रालयात घेतला. राज्यात भाजप- शिवसेना युती सरकार असताना २० वर्षापूर्वी राज्याच्या जलसंधारण विभागाने २१ डिसेंबर १९९६ रोजी जामखेड तालुक्यातील मुंजेवाडी लघु पाटबंधारे तलावास मान्यता दिली होती. १ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या या तलावात ३९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होत असून १५६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या बाधित शेतकऱ्यांना २० वर्षानंतर नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)