७० दिवसांच्या मुक्कामानंतर छावणीला ‘बाय-बाय’ : पावसाची जोरदार सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 05:44 PM2019-06-10T17:44:11+5:302019-06-10T17:44:19+5:30
तब्बल ७० दिवस घरापासून दूर, घरच्या मायेला पारखी झालेली आणि छावणीतच कसा बसा आपला संसार मांडलेल्या जनावरांना आता घरची ओढ लागली आहे
योगेश गुंड
केडगाव : तब्बल ७० दिवस घरापासून दूर, घरच्या मायेला पारखी झालेली आणि छावणीतच कसा बसा आपला संसार मांडलेल्या जनावरांना आता घरची ओढ लागली आहे. नगर तालुक्यात काही गावात जोरदार पावसाने सलामी दिल्याने अनेक छावण्यांचे नुकसान झाले. छप्पर वारा आणि पावसाने हिरावून घेतले. यामुळे बु-हाणनगर परिसरातील अनेक जनावरांचा आपल्या घराकडे परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज तालुक्यातील पूर्व भागातील बु-हाणनगर, कापूरवाडी, सारोळाबद्धी, चिचोंडी पाटील भातोडी, मदडगाव, मेहेकरी परिसरातील गावांना पावसाने जोरदार सलामी दिली. जवळपास तासभर धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळल्या.
नगर तालुक्यात १ एप्रिल पासून छावण्या सुरु झाल्या. तालुक्यात जवळपास ६६ छावण्यामध्ये ७० हजार जनावरे आहेत. रविवारी वाळकी परिसर सोडून तालुक्यात कुठेच जास्त पाउस झाला नाही. आज मात्र तालुक्यातील पूर्व भागात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. तालुक्यातील बु-हाणनगर येथे दुपारी जोरदार पाऊस आणि वारा सुरु झाला. यामुळे जनावरांच्या छावणीचे नुकसान झाले. शेतक-यांची मोठी धावपळ झाली. शेतक-यांनी लगेच आपली जनावरे आपल्या घरी नेण्याची तयारी सुरु केली. पावसाच्या आगमनानंतर तब्बल ७० दिवस छावणीतील आपला मुक्काम संपून जनावरांचा आपल्या घराकडे प्रवास सुरु झाला.
कधी पाउस येईल आणि कधी घरातील हक्काचा चारा मिळेल याची आस जनावरांनाही लागली असावी म्हणूनच घरच्या ओढीने जनावरांची पावले घराकडे परतताना आनंदली होती. घराकडे जाताना मात्र छावणीत घालवलेली ७० दिवसांची आठवण मुके जनावरे आपल्या स्मृतीत ठेऊन छावणीतून घराकडे परतत होती. छावणीतील भजन, कीर्तन, काही सांस्कृतिक कार्यक्रम गावातील लोकांनी आपल्या मुक्या जनावरांसोबत साजरे केले. त्याची मात्र आता फक्त आठवणी मुक्या जनावरांच्या मनात राहिल्या.
शेतात पाणी साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. ज्या गावात जोरदार पाऊस कोसळला त्या ठिकाणचे छावणीतील जनावरेही आता परतीच्या प्रवासला निघण्याची तयारी करीत आहेत. तालुक्यातील जेऊर परिसर, वाळकी परिसर, सारोळा कासार परिसर, निंबळक, हिंगणगाव, टाकळी खातगाव जखणगाव आदि भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतक-यांना आहे.