वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या

By चंद्रकांत शेळके | Published: June 20, 2023 08:17 PM2023-06-20T20:17:09+5:302023-06-20T20:17:34+5:30

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या.

After a year those teachers finally returned home, 89 teachers will get appointments by inter-district transfer |  वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या

 वर्षभरानंतर अखेर ‘ते’ शिक्षक परतले स्वगृही, आंतरजिल्हा बदलीने ८९ शिक्षकांना मिळणार नियुक्त्या

अहमदनगर: गेल्या वर्षी ॲानलाईन आंतरजिल्हा बदली झाली, परंतु संबंधित जिल्ह्यात १० टक्केपेक्षा जादा रिक्त जागा राहत असल्याने कार्यमुक्त होऊ न शकलेेले ८९ शिक्षक आता वर्षभरानंतर कार्यमुक्त झाले असून त्यांना आता स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात नियुक्ती मिळणार आहे.

राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या. यात इतर जिल्ह्यांतून २६५ शिक्षकांच्या बदल्या नगर जिल्ह्यात झाल्या. परंतु विहीत मुदतीत केवळ १७६ शिक्षक हजर झाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन करून जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या गेल्या. परंतु ८९ शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्तच केले नव्हते.

संबंधित शिक्षकाला नवीन जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. शिक्षण हक्क कायदा २००९ च्या कलम २६ अन्वये जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या १० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत. त्यामुळेच बदलीने रिक्त पदांचा रेशो १० टक्केपेक्षा खाली जात असल्याने या शिक्षकांना कार्यमुक्त केले गेले नव्हते. परिणामी बदली होऊनही हे शिक्षक त्याच जिल्ह्यात अडकून पडले. आता आंतरजिल्हा बदलीने पुन्हा हा रेशो राखला जात असल्याने संबंधित जिल्ह्यांतील प्रशासनाने या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. अखेर हे ८९ शिक्षक आता स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात बदलून आले आहेत.
 
समुपदेशनाने पदस्थापना
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या या ८९ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून समुपदेशनाने पदस्थापना दिली जाणार आहे. त्यासाठी दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषदेत समुपदेशन वर्ग आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील शिक्षकांना पडद्यावर दाखवून ही पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यासाठी संवर्ग १, संवर्ग २मधील शिक्षकांना आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद सभागृहात बोलावले जाणार आहे. शिक्षण विभागाने २१ जून रोजीच हा समुपदेशन वर्ग आयोजित केला होता. परंतु काही कारणास्तव तो पुढे ढकलला आहे.

Web Title: After a year those teachers finally returned home, 89 teachers will get appointments by inter-district transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.