प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:19 AM2021-03-25T04:19:51+5:302021-03-25T04:19:51+5:30
कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र ...
कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख किसन विठ्ठल पवार यांनी मंगळवारी (दि.२३) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.
या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांचे हस्ते लिंबूपाणी घेऊन दुपारी दोन वाजता उपोषण मागे घेतले.
पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून घारी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवावी किंवा आर.ओ. प्लांट बसवावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले गेले नाही. नुकतेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली, असता सदर पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. गावातील अनेक लोक डाऊच बुद्रूक, चांदेकसारे येथून पिण्याचे पाणी आणतात. यामध्ये वेळ, इंधन व पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होतोच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या उपोषणावर ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत आर. ओ. प्लांटचे नियोजन करून कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. असे पवार यांनी सांगितले आहे. याप्रसंगी कुणाल जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात, मच्छिंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब पाटील, शेतकरी लक्ष्मण पवार उपस्थित होते.