छावण्या मंजुरीनंतर आता जनावरांची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:47 AM2019-03-01T11:47:02+5:302019-03-01T11:47:45+5:30
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत.
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत. आपली जनावरे दुसऱ्या छावणीत जाता कामा नये, या गावातील राजकारणाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाच बसला आहे.
मंजूर छावण्यांपैकी बहुतांश छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. कमीत कमी ३०० जनावरे असणाऱ्या छावण्यांनाच शासन अनुदान देणार आहे. त्यामुळे हे ३०० जनावरे जमवण्याचे काम छावणीचालकांकडून सुरू आहे. काही गावांत तेवढे जनावरे तर आहेत. परंतु राजकारणातून किंवा विरोधातून जनावरे छावणीत येऊ दिले जात नाहीत. अनेक गावांत एकापेक्षा जास्तजण छावणी चालवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे गावात छावणी मंजूर असली तरी त्यात जनावरे जाण्यापासून रोखले जात आहेत. ऐनवेळी छावणीचा आपला प्रस्ताव मंजूर झाला, तर ३०० जनावरे आणायची कोठून, या स्पर्धेतूनही ही स्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनाच जास्त छावण्या मंजूर झाल्याचेही आरोप होत आहेत. एकंदरीतच दुष्काळात व तेही मुक्या प्राण्यांच्या बाबतीत आर्थिक गणितातून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळते आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ४६ छावण्या मंजूर
आतापर्यंत ४६ छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून यात सर्वाधिक २७ छावण्या पाथर्डी तालुक्यात आहेत. त्यानंतर पारनेर व जामखेड तालुक्यात प्रत्येकी ६, नगर व कर्जतमध्ये प्रत्येकी ३, तर श्रीगोंदा तालुक्यात १ छावणी मंजूर आहे.