नेप्ती बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतक-यांनी लिलाव पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:32 AM2018-01-11T11:32:18+5:302018-01-11T11:45:03+5:30
गुरुवारी सकाळी नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याचे तब्बल १००० ते १२०० रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. व्यापा-यांनी अचानक भाव पाडल्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीत आंदोलन सुरु केले आहे.
अहमदनगर : गुरुवारी सकाळी नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याचे तब्बल १००० ते १२०० रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. व्यापा-यांनी अचानक भाव पाडल्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीत आंदोलन सुरु केले आहे. नेप्ती उपबाजार समितीचे गेट बंद करून शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबर प्रतिच्या कांद्यास ३५०० ते ४००० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तसेच दोन नंबर प्रतिच्या कांद्यास २५०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला होता. मात्र आज, गुरुवारी एक नंबर प्रतवारीच्या कांद्यास प्रति क्विंटल २५०० रुपये पेक्षाही कमी भाव व्यापा-यांनी देऊ केला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत आंदोलन सुरु केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला प्रतिक्विंटलला ३ हजार रुपयेपेक्षा जास्त भाव मिळत आहे. मात्र, गुरुवारी अचानक मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले.