नगर जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीनंतर काळ्या फिती लावूनच शिक्षक परतले शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 09:00 PM2017-11-02T21:00:40+5:302017-11-02T21:08:55+5:30
अहमदनगर : शिक्षकांची काढून घेण्यात आलेली हक्काची कुटुंब निवृत्ती योजना, आॅनलाईन व शालेय पोषण आहाराची किचकट नोंदणी पद्धत, शिक्षकांवर ...
अहमदनगर : शिक्षकांची काढून घेण्यात आलेली हक्काची कुटुंब निवृत्ती योजना, आॅनलाईन व शालेय पोषण आहाराची किचकट नोंदणी पद्धत, शिक्षकांवर टाकण्यात आलेला अशैक्षणिक कामांचा बोजा तसेच दर आठवड्याला निघणा-या नवनवीन शासन निर्णयामुळे शिक्षक वैतागले असताना २३ आॅक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून शिक्षकांनी अध्यापनाचे काम केले.
शहरातील सेक्रेटहार्ट कॉन्व्हेंट, पंडित नेहरु हिंदी विद्यालय आदींसह जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी पहिल्या दिवशी काळ्या फिती लावत अध्यापन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, नाशिक विभागप्रमुख सुनील पंडित, सुहास धिवर, वैभव शिंदे, सुदेश छजलाने, विनित थोरात, विशाल महल्ले, कमल भोसले, मोनिका मेहतानी, शिल्पा पाटोळे, उज्ज्वला आदिक, उषा शौरान, अंजली मिश्रा, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.
समान काम समान वेतन या संवैधानिक हक्काची पायमल्ली करत १ नोव्हेंबर २००५ रोजी शिक्षकांच्या हक्काची कुटुंब निवृत्ती योजना काढून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करुन, शिक्षकांच्या तोंडातून घास काढून घेण्यात आला असून, शिक्षकांच्या जीवनातील हा काळा दिवस आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्याकरिता शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचे स्वरुप बदलून त्यामध्ये जाचक अटीचा समावेश केला आहे. या जाचक अटीमुळे बहुसंख्य शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यापासून वंचित राहणार असून हा शासन निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक पध्दतीने लादण्यात येत असल्याची भावना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी व्यक्त केली.