फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती; महिला, मुलींनो काळजी घ्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:32 PM2020-12-02T13:32:59+5:302020-12-02T13:35:00+5:30
संगमनेर : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडून त्याद्वारे पैश्यांची मागणी करणे, फसवणूक होणे, महिला, मुलींना अश्लील संदेश पाठविणे अशा अनेक घटना घडल्या आहेत, घडत आहेत. फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ट्विटर, इंस्टाग्रामवर खाते असलेल्यांनी विशेष करून महिला व मुलींनी काय काळजी घ्यावी. या संदर्भाने सायबर सुरक्षा तज्ज्ञ, विश्लेषक ओंकार गंधे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.
शेखर पानसरे
प्रश्न : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडणा-यांचा हेतू काय असतो?
गंधे : पूर्वी फेसबुकवर बनावट खाती उघडली जायची. आता ती ट्विटर, इंस्टाग्रामवरही उघडली जात आहेत. बनावट खाती उघडून संबंधित व्यक्तीचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना खोट्या खात्यात जोडले जाते. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. काही सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो, व्हिडिओमध्ये बदल केला जातो. खोट्या खात्यांवर त्या व्यक्तीच्या नावाने अश्लील फोटो, संदेश टाकले जातात. हे फोटो, व्हिडिओ अगदी हुबेहुब वाटतात. त्यामुळे बदनामी होते. वेगवेगळे हेतू ठेवून बनावट खाती उघडली जातात. हे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
प्रश्न : बनावट खात कसे तयार केले जाते?
गंधे : लॉकडाऊन काळात अनेकांचे ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक खातेधारक असेही आहेत की त्यांचे खाते अगदी हुबेहुब तयार केले गेले. त्यावरील फोटो, ट्विट कॉपी करून नवीन खाते त्याच नावाने सुरू करण्यात आले. काही जणांचे ट्विटरवर खातेही नसते. त्यांचे फेसबुकवरील फोटो, पोस्ट कॉपी करत बनावट खाती तयार केली जातात.
प्रश्न : बनावट खाते कसे ओळखता येईल?
गंधे : बनावट खाते ओळण्यासाठी दोनच गोष्टी आहेत. पहिली गोष्टी, यामध्ये खातेधारकाला आपले बनावट खाते उघडल्याचे निर्देशनास आले तर बनावट खाते उघडल्याचे समोर येवू शकते. दुसरी गोष्ट, एकाच व्यक्तीचे दोन खाते असल्याने त्या व्यक्तीचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात संभ्रम निर्माण होतील. तेव्हा त्यांनी इतर माध्यमांच्याद्वारे त्या व्यक्तीशी संपर्क करावा. समाज माध्यमांवर खाती नसलेल्यांची देखील खोटी खाती ख-या नवाने उघडली जातात. त्यावर व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून चोरलेले फोटो टाकले जातात.
प्रश्न : समाजमाध्यमांवर खाते असलेल्यांनी काय काळजी घ्यावी?
गंधे : सायबर गुन्ह्यात गुन्ह्यांचे स्वरूप बदलते असते. समाजमाध्यमांवरील खात्यावर आपण फोटो किंवा माहिती टाकतो, ती सायबर चोरट्यांकडून चोरली जाते. समाजमाध्यमांवर खाती उडताना आपल्याकडील मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. त्यामुळे कुणीही खात्यामध्ये छेडछाड केल्यानंतर तो संदेश आपल्या मोबाईलवर येतो. खोटे खाते उघडलेले असेल तर ते खाते बंद करण्यासाठी आणि आपले खरे खाते टिकून राहण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर होतो. मात्र, महिला व मुलींनी आपला मोबाईल क्रमांक खात्याला कुणालाही दिसणार असे करता येवू शकते बनावट खात्यासंदर्भाने सायबर पोलिसांशी संपर्क करत तक्रार करावी. हे गरजेचे आहे.