क्रीडापाठोपाठ दहावीच्या रेखाकला गुणांवरही गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:20 AM2021-04-01T04:20:56+5:302021-04-01T04:20:56+5:30
(डमी) अहमदनगर : प्रतिवर्ष शासकीय रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना त्यांच्या ग्रेडनुसार दहावीच्या परीक्षेत सवलतीचे अतिरिक्त गुण दिले ...
(डमी)
अहमदनगर : प्रतिवर्ष शासकीय रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या
विद्यार्थ्याना त्यांच्या ग्रेडनुसार दहावीच्या परीक्षेत सवलतीचे अतिरिक्त गुण दिले जातात. पण यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देऊ नये असे परिपत्रक शासनाने
नुकतेच काढले आहे. याचा फटका जिल्ह्यातील जवळपास पाच ते आठ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. क्रीडापाठोपाठ विद्यार्थ्यांचे रेखाकलेचे गुणही गेल्यामुळे कलाशिक्षक, विद्यार्थी, तसेच पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दहावीच्या मुलांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या गुणासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या आदेशानुसार माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील शाळांकडून मागवून घेतले. परंतु कोरोना महामारीमुळे चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा घेतल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने २६ मार्च रोजी नवीन परिपत्रकात चालू
प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेत सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नये, असा आदेश काढला आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी २०२० पूर्वीच शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना जर सवलतीचा लाभ मिळाला नाही तर नवीन नियम त्यांच्यासाठी अन्यायकारक असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत नवीन आदेशात बदल करत, विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच सवलतीचे गुण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
-------------
गुण देण्याबाबत शिक्षक भारतीची मागणी
विद्यार्थ्यांना नियमानुसार हे गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार आदींनी केली आहे.
----------
वाढीव कला गुणांचे प्रस्ताव शाळांकडून सादर झालेले आहेत. परंतु गुण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. विद्यार्थी कलेवर मेहनत घेतात, त्याचा मोबदला त्यांना मिळायला हवा.
- सुनील दानवे, कलाशिक्षक
-------------
रेखाकला किंवा इतर कलेच्या परीक्षा विद्यार्थी जीवनात महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्यांनी मेहनतीने या परीक्षा दिल्या आहेत तर शासनानेही याचा विचार करायला हवा. हे गुण कोणत्या कारणामुळे रद्द केले याचाही खुलासा शासनाने केलेला नाही.
- अशोक डोळसे, कलाशिक्षक
-------------
ग्रेडनुसार मिळणारे गुण
ए - ७ गुण
बी - ५ गुण
सी - ३ गुण
------------
डमी फोटो मेल वर