बेमुदत उपोषणानंतर शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:29 PM2018-02-26T19:29:37+5:302018-02-26T19:31:12+5:30
विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
अहमदनगर : शालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे थकीत व नियमित वेतनासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार (दि.२६) विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यात ५ लाख ७० हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे अदा करण्यात येते. शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ही प्रणाली बंद पडली. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. डिसेंबरमध्ये ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून झाले, त्या शिक्षकांचेच जानेवारी महिन्याचे वेतन आॅफलाईन पध्दतीने करण्यात आले़ परंतु ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे डिसेंबर पूर्वीचे वेतन अदा झालेले नाही अशांना आॅफलाईन प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यात आले नाही. यामुळे अशा शिक्षकांचे थकीत वेतन व नियमित वेतनाचा प्रश्न गंभीर बनला होता .
त्यामुळे शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व शिक्षक आमदार नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी हे उपोषणास बसले होते. याची दखल घेत गाणार, कडू यांच्यासमवेत सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली़ शिक्षकांचे थकीत वेतन देण्याचे परिपत्रक काढतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटल्याची माहिती बोडखे यांनी दिली.
शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाध्यक्ष प्रा़ सुनील पंडित, ग्रामीण अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष शशिकांत थोरात, विनायक कचरे, सचिव तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, जेष्ठ मार्गदर्शक आबा मुळे, प्रा. सुनील सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, बबन शिंदे, निलेश बांगर, नितीन म्हस्के, प्रा. श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, सुरेश विधाते, अरविंद आचारी, अनिल आचार्य, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी आदींनी या निर्णयाचे स्वागत केल्याचे बोडखे यांनी सांगितले.