कर्जत पाठोपाठ जामखेड नगपरिषदेतही भाजपला धक्का; तीन सहयोगी नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 01:20 PM2020-09-30T13:20:04+5:302020-09-30T13:20:13+5:30
जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथेही भाजपला गळती लागली आहे.
जामखेड : मागील चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथेही भाजपला गळती लागली आहे.
जामखेड येथील विश्रामगृहावर प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, दयानंद कथले, सतिष चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.
यावेळी नगरसेवक महेश निमोणकर म्हणाले, मी अपक्ष निवडून येऊन भाजपला विनाशर्थ पाठिंबा दिला होता. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते. तरीही भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते. शहराचा खुंटलेला विकास व आ. रोहीत पवार यांनी औद्योगिक वसाहत व शहराचा करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून होणारी पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी उचलले पाऊल पाहून आम्ही प्रभावीत झालो. यामुळे प्रमुख कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चा करून राष्ट्रवादीचे उदयोन्मुख नेतृत्व आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.