अण्णा हजारेंची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी मोदी सरकारला दिला इशारा; म्हणाले...
By मुकेश चव्हाण | Published: January 30, 2021 06:17 PM2021-01-30T18:17:52+5:302021-01-30T18:26:17+5:30
अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली.
अहमदनगर/ मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अण्णा हजारेंची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.
अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील विभागनिहाय पिकांना हमीभाव व बाजार मूल्य मिळाले पाहिजे, असं सांगून शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या आणि आंदोलने यावर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्वामीनाथन आयोगासह शेतकऱ्यांसंबंधी अन्य पंधरा मुद्द्यांवर सहा महिन्यांच्या आत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत. अन्यथा सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिला.
केंद्र सरकारने आश्वासन दिले असल्याने अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू. जर हे प्रश्न समाधानकारक पद्धतीने मार्गी लागले नाहीत तर आम्हीच पुढाकार घेऊन आंदोलन उभे करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
तत्पूर्वी, केंद्राला सूचविलेल्या मुद्यांना उशीर झाला. तो त्यांनी मान्य केला. मी केंद्राला १५ मुद्दे सुचविले होते. हे मुद्दे आता कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील. हे प्रश्न सुटले तर शेतक-यांना दिलासा मिळेल. आज दिलेल्या आश्वासनामुळे मी उपोषण मागे घेतले आहे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.
फडणवीसांनी मानले आभार
लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि अण्णा हजारेजी यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे. यापूर्वी अण्णा हजारेजी यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवालसुद्धा यावेळी त्यांना सादर केला. अण्णा हजारेंनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे ट्विट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.