हत्याकांडानंतर आता बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:27+5:302021-03-27T04:21:27+5:30
रेखा जरे हत्याकांडाच्या गुन्ह्यात बोठे पोलीस कोठडीत होता. गुरुवारी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. यावेळी कोतवाली पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून ...
रेखा जरे हत्याकांडाच्या गुन्ह्यात बोठे पोलीस कोठडीत होता. गुरुवारी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. यावेळी कोतवाली पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. कोतवाली ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शुक्रवारी दुपारी बोठे याला जिल्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने बोठे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने बोठे याला एक दिवसाची पोलीस काेठडी दिली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर २०२० रोजी एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बाळ बोठे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
----------------------------------
खंडणीच्या गुन्ह्यातही बोठेची चौकशी
बाळ बोठे याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०२० रोजी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तोफखाना पोलीस बोठे याला वर्ग करून घेेणार आहेत. यासंदर्भात शुक्रवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अर्ज करून परवानगी घेतली आहे. शनिवारी पारनेर न्यायालयात अर्ज करून बोठे याला वर्ग करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.
-----------------------------------------
पोलिसांची आता पुरवणी दोषारोपपत्राची तयारी
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी बोठे याच्यासह सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे याला अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीतून अनेक बाबी नव्याने समोर आल्या आहेत. पोलीस आता बोठे याच्याविरोधात न्यायालयात थोड्याच दिवसांत पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.