जनता कर्फ्यूबाबत ढकलाढकल, स्थानिक नेत्यांनीही सोडली जनतेवर जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:18 PM2020-09-17T22:18:02+5:302020-09-17T22:18:10+5:30
अहमदनगर: नगर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा निर्णय आता जनतेवरच सोडला आहे़ नगर शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी जाहीर केली़

नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी पुढे आली आहे़ शहरातील विविध संघटनांनीही महापालिका आयुक्तांकडे तशी मागणी केली होती़ यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ हे काय निर्णय घेतात, याबाबत नगरकरांना उत्सुकता होती़ परंतु, पालकमंत्री मुश्रिफ यांनी जनता कर्फ्यूबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडली़ या बैठकीला आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते़ त्यांनीही पत्रकारांशी बोलताना आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत़ जनतेला जे हवे आहे, ते होईल़ शहरातील व्यापारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अन्य संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे़ शहरातील विविध घटकांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेऊनच पुढचा निर्णय होणार आहे़ राज्यातील काही शहरांत जनता कर्फ्यू लावण्यात आला़ परंतु, त्याचे पालन नागरिकांकडून होत नाही़ रस्त्यांवर गर्दी होतेच़ त्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी होत नाही, असा अनुभव आहे़
़़़
शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, व्यापारी, विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल़
- बाबासाहेब वाकळे, महापौर
़़़
जनता कर्फ्यू लागू करण्यास विरोध नाही़ परंतु, जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी चर्चा करणे गरजेचे आहे़ सर्वांशी चर्चा करून याबाबाबत महापालिकेला कळविण्यात येईल़
-संग्राम जगताप, आमदार