बोंडअळीचे उर्वरित ३७ कोटी अखेर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:32 PM2018-11-03T13:32:15+5:302018-11-03T13:32:29+5:30
बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले.
अहमदनगर : बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले. त्यामुळे शेतक-यांना दिवाळीच्या तोंडावर चांगलाच दिलासा मिळाला आहे. परंतु हे पैसे प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात कधी जमा होतात, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.
गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. या कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडून १५७.२३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. हे अनुदान तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्त्यापोटी ८३ कोटी ७२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातील ८३ कोटी ५१ लाख रूपयांचे वाटप शेतकºयांना करण्यात आले. (२० लाखांचे वाटप अद्याप बाकी) परंतु तरीही अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिल्याने जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्यासाठी ३७.६४ कोटी रूपयांची वाढीव मागणी २१ सप्टेंबर रोजी शासनाकडे कळवली होती.
यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे या अनुदानाची वाट पाहत होते. अखेर दीड महिन्यानंतर उर्वरित ३७ कोटी ६४ लाख ३१ हजार ९९१ रूपयांचे बोंडअळीचे अनुदान शुक्रवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले आहे. आता येथून हे अनुदान संबंधित तहसीलकडे वर्ग होऊन तेथून थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दिवाळीच्या आधी हे अनुदान आले असले तरी प्रत्यक्षात दिवाळीला हे अनुदान शेतक-यांना मिळेल की दिवाळीनंतर, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.
बोंडअळीच्या तिस-या टप्प्यातील ३७.६४ कोटी रकमेची मागणी शासनाकडे केली होती. अखेर हे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेले आहे. लवकरात लवकर संबंधित तहसीलकडे ही रक्कम वर्ग करून दिवाळीसाठी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी