आमदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर; अहमदनगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 07:30 PM2024-03-30T19:30:49+5:302024-03-30T19:33:03+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Nilesh Lanke ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्या पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामध्ये पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत असलेल्या लंके यांनी शुक्रवारी रात्रीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज लगेचच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे.
निलेश लंके हे मागील काही महिन्यांपासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिल्याने ते महायुतीत गेले आणि त्यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचंही नाव लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र काही दिवसांपूर्वी लंके यांनी आपल्या मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले होते. त्यानंतर कोल्हे यांनी निलेश लंकेंना हातात तुतारी घेण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश निश्चित झाला. मात्र ते अजित पवारांच्या पक्षाचे आमदार असल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. अखेर काल निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांच्या लोकसभा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
आमदारकीचा राजीनामा देताना कोसळले होते रडू
निलेश लंके यांनी शुक्रवारी सायंकाळी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना लंके यांनी विखे पाटील यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडवली. त्यांनी मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंद घालण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे लंके म्हणाले. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना रडू कोसळले. जनतेने आपणाला निवडून दिले. पण ही लढाई लढण्यासाठी मुदतपू्र्व राजीनामा देण्याची वेळ आली. आपण शरद पवारांना लोकसभा लढवण्याचा शब्द दिला होता. मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचे दु:ख आहे. ती भरपाई करण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी सांगितले.