सोळा वर्षानंतर कुटुंबावर पुन्हा काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:28 PM2018-09-04T18:28:10+5:302018-09-04T18:42:20+5:30
अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला.. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती.
राजूर : अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती. या अपघातात नशिबाने वाचलेले दिपक प्रभाकर कुलकर्णी तर मंगळवारी ( ४ संप्टेबर) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भाबडबारी जवळ बस व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (३९) ठार झाले. यामुळे या कुटुंबाचा आधारच संपुष्टात आला.या वृत्ताने चितळवेढे गावाबरोबरच परिसरातील गावांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या दोन तीन पिढ्यांपासून कुळकर्णी कुटुंब चितळवेढे व परिसरातील गावांमध्ये भिक्षुकी करून गुजराण करत होते. पुढे प्रभाकर कुलकर्णी यांनी भिक्षुकी सुरु केली. लग्नानंतर या कुटुंबाला तीन मुले आणि एक मुलगी झाली. एक प्रामाणिक कुटुंब म्हणून परिसरात या कुटुंबाची ख्याती होती. मुले मोठी होऊ लागली, शालेय शिक्षण घेऊ लागली. सुखी संसाराचे दिवस सुरु झाले. मात्र नियतीच्या मनात वेगळच होत. सुमारे १६ वर्षा पूर्वी या कुटुंबातील मोठी मुलगी, दोन मुले व जावई, नातू देवदर्शनासाठी शनिशिंगणापूर-शिर्डी येथे गेले होते. त्यावेळी वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दोन मुले व त्यांची मुलगी ठार झाली. दिपकही या प्रवासास जाणार होता मात्र ऐनवेळी तो गेला नाही. कमावती झालेली मुले काळाच्या पडद्याआड गेली आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी पुन्हा भिक्षुकी सुरू केली. पुढे दीपक मोठा झाला. वेद मंत्र शिकला आणि परिसरात एक चांगला ब्राम्हण म्हणून त्यांनी नाव मिळविले. कुटुंबातील कर्ते मुले गेल्याचे दु:ख पचवत मोठ्या धक्क्यातून हे कुटुंब पुन्हा एकदा उभे राहिले. पुढे दिपकचे लग्न झाले. त्याला दोन मुले झाली. एक मुलगा त्रंबकेश्वर येथे वेद विद्या शिकत आहे तर दुसरा शालेय शिक्षण घेत आहे. दीपक पूजे निमित्ताने गावोगावी फिरू लागले. असाच प्रवास करताना आज मंगळवारी दुपारी नंदुरबारहून नाशिककडे येणा-या एस टी बसने प्रवास करत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि ते प्रवास करत असलेल्या बसचा तालुक्यातील भाबडबारीत येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपघातात दिपक यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. बसमधील आणखी ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
उतारवयात मोठे धक्के पचवत सावरत असलेल्या या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. दीपक यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच चितळवेढे सह परिसरातील गावांवर शोककळा पसरली. मयत दिपकच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.