बदलीनंतर अखेर १७८४ गुरुजी कार्यमुक्त, नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शाळा
By चंद्रकांत शेळके | Published: May 18, 2023 12:22 PM2023-05-18T12:22:18+5:302023-05-18T12:22:33+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली
अहमदनगर : गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून, बदली झालेल्या १७८४ शिक्षकांना नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात या शिक्षकांना आता नव्या शाळेवर हजर व्हावे लागणार आहे.
मागील वर्षीची शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ॲाक्टोबर २०२२ पासून ॲानलाईन सुरू झाली. परंतु, पाच ते सहा वेळा बदल्यांच्या या वेळापत्रकात बदल झाले. मार्च २०२३ अखेर बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली व यात जिल्ह्यातून १७८४ शिक्षकांची बदली झाली. तेव्हापासून हे शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत होते. परंतु, एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षाचा काळ लक्षात घेता त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. अखेर शाळांना सुट्या लागल्यानंतर शासनाने आदेश काढून १६ ते ३१ मे दरम्यान बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यातील शिक्षकांना दोनच दिवसांत कार्यमुक्त करण्यात आले. बदली झालेल्या संबंधित शिक्षकांनी आपला बदली आदेश टीचर ट्रान्सफर पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यायचा आहे. तसेच दोन दिवसांत संबंधित शाळेत जाऊन रुजू व्हायचे आहे.
अशा झाल्या बदल्या
संवर्ग १ - २९९
संवर्ग २ (पती-पत्नी एकत्रीकरण) - १७२
बदली अधिकारप्राप्त शिक्षक - १९१
बदलीपात्र शिक्षक - १०३७
विस्तापित शिक्षकांटी फेरी - ३९
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याची फेरी - ४६
एकूण - १७८४
बदलीत ४८० मुख्याध्यापकांचा समावेश
१७८४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये ११८९ उपाध्यापक, ११५ पदवीधर शिक्षक, तर ४८० मुख्याध्यापकांचा समावेश आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून नवीन ठिकाणी गुरुजी हजर होणार आहेत.
‘त्यांची’ सेवापुस्तकात नोंद करा
दिव्यांग, दुर्धर आजार असलेले, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, ५३ वर्षांपुढील कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक या कर्मचाऱ्यांना (संवर्ग १) बदलीत सूट मिळते किंवा ते सोयीच्या ठिकाणी बदली मागू शकतात. परंतु, ही सवलत घेतल्यास त्यांनी कोणत्या घटकाची सवलत घेतली याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात व्हावी, अशी मागणी शिक्षकांमधून पुढे आली आहे. अशी नोंद व्हायला लागली तर बदलीतील अनेक गैरप्रकार टळतील, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, संवर्ग १ मध्ये बदली झालेल्या २९९ पैकी २८५ मुख्याध्यापक आहेत.